धिंगरी अळिंबाची लागवड पद्धत :
अत्यंत कमी भांडवल गुंतवणूक करून धिंगरी अळिंबीची लागवड सहज करता येते. महाराष्ट्रातील हवामान धिंगरी अळिंबीस अनुकूल असल्याने वर्षभर लागवड करणे शक्य आहे.
1. लागवडीसाठी जागेची निवड
अळिंबीच्या लागवडीसाठी उन, वारा, पाऊस यापासून संरक्षण होईल अशा निवार्याची गरज असते. पक्के अथवा कच्चे बांधकाम असलेली खोली अथवा शेड, आच्छादित असलेली झोपडी असावी. या जागेमध्ये तीव्र सूर्यप्रकाश नसावा व हवा खेळती राहिल याची दक्षता घ्यावी लागते.
2. लागवडीसाठी माध्यम
धिंगरी अळिंबीच्या लागवडीसाठी पिष्टमय पदार्थ अधिक असणार्या घटकांची आवश्यकता असते. यासाठी शेतातील पिकांचे अवशेष, भातपेंढा, गव्हाचे काड, ज्वारी, बाजरी, मका यांची ताटे व पाने, कपाशी, सोयाबीन, तुर काड्या, उसाचे पाचट, नारळ व केळी यांची पाने, भुईमुगाच्या शेंगाचे टरफले, वाळलेले गवत व पालापाचोळा इत्यादी घटकांचा वापर करता येतो.
3. लागवडीसाठी वातावरण
अळिंबीच्या लागवडीसाठी नैसर्गिक तापमान 22 ते 30 अंश सें. हवेतील आर्द्रता 65 ते 90 टक्के असणे आवश्यक असते. यासाठी लागवडीच्या ठिकाणाचे तापमान व आर्द्रता यांचे नियंत्रण ठेवणेसाठी जमिनीवर, हवेत तसेच चोहोबाजूंनी गोणपटाचे आवरण लावून त्यावर स्प्रे पंपाने पाणी फवारण्याची व्यवस्था करावी. सर्वसाधारण 25 अंश से. या तापमानास या अळिंबीची उत्तम वाढ होते.
4. लागवडीची पद्धत :
काडाचे 2 ते 3 सें.मी. लांबीचे बारीक तुकडे पोत्यामध्ये भरून थंड पाण्यात 8 ते 10 तास बुडवून भिजत घालावे. काडाचे पोते थंड पाण्यातून काढून त्यातील जादा पाण्याचा निचरा करावा.
5. काडाचे निर्जंतुकीकरण करणे :
मशरूम उत्पादन प्रकल्पाचे यश किंवा अपयश हे प्रामुख्याने काडाच्या निर्जंतुक करण्याच्या प्रक्रियेवर अवलंबून असते. तेव्हा ही प्रक्रिया काळजीपूर्वक करणे गरजेचे आहे. निर्जंतुकीकरण करण्यासाठी खालीलपैकी कोणत्याही एका पद्धतीचा अवलंब करावा.
अ) उष्णजल प्रक्रिया
ब) उष्णबाष्प प्रक्रिया
क) अॅटोक्लेव्हिंग प्रक्रिया
ड) रासायनिक प्रक्रिया
अ) उष्णजल प्रक्रिया : या पद्धतीमध्ये भिजलेल्या काडाचे पोते 80 सें.ग्रे. तापमानाच्या गरम पाण्यात 1 तास बुडवावे व त्यानंतर पाण्याचा निचरा होण्यासाठी पोते सावलीत तिवईवर अथवा रॅकवर ठेवावे.
ब) उष्णबाष्प प्रक्रिया : या प्रक्रियेमध्ये बॉयलरच्या सहाय्याने पाण्याची वाफ तयार करण्यात येते व ही उष्ण वाफ (80 अंश से. ग्रे. तापमान) एका बंद खोलीत ओल्या काडामध्ये 1 तास सोडली जाते. जास्तीची वाफ बाहेर जाण्यासाठी खोलीच्या वरच्या बाजूला एक व्हेंटीलेटर ठेवावे.
क) अॅटोक्लेव्हिंग प्रक्रिया : या प्रकारची प्रक्रिया करण्यासाठी अनेक कंपन्यांचे व आकारमानाचे अॅटोक्लेव्ह बाजारात मिळतात. प्रकल्पाच्या क्षमतेनुसार व खर्चाच्या बजेटनुसार अॅटोक्लेव्ह निवडून त्यामध्ये ओल्या काडाची पोती भरावीत. हे यंत्र विजेवर अॅटोमॅटीक चालणारे असून यामध्ये 15 पौड बाष्प दाबाला 15 मिनिटे ठेवावे. त्यानंतर अॅटोक्लेव्ह बंद करून थंड होऊ द्यावे व साधारण अर्ध्या तासानंतर काड बाहेर काढावे व थंड होऊ द्यावे. ही पद्धत खर्चिक जरी असली तरी काड पूर्णपणे निर्जंतुक होते. त्यामुळे मशरूमच्या वाढीच्या काळात हानीकारक जिवजंतूचा प्रादुर्भाव होत नाही.
ड) रासायनिक प्रक्रिया : रासायनिक पद्धत ही कमी खर्चाची व सोपी आहे. तथापि, याद्वारे काड प्रक्रिया करण्यास जास्त वेळ लागतो व मशरूम वाढीच्या काळात अन्य जिवाणूची वाढ होण्याची शक्यता असते. या पद्धतीमध्ये पाण्याच्या हौदात अथवा ड्रममध्ये 7.5 ग्रॅम कार्बेन्डाझीम अधिक 125 मिली फॉर्मेलीन ही बुरशी तसेच जंतुनाशके 100 लिटर पाणी या प्रमाणात मिसळावीत. वाळलेले काडाचे तुकडे पोत्यात भरून पाण्याच्या द्रावणात 16 ते 18 तास भिजत ठेवावे. त्यानंतर पोती बाहेर काढून जास्त पाण्याचा निचरा करावा.
6. बेड भरणे
निर्जंतुक केलेले काड 35 सें.मी. × 55 सें.मी. आकाराच्या 5 टक्के फॉर्मेलीनमध्ये निर्जंतुक केलेल्या प्लॅस्टिक पिशव्यामध्ये थर पद्धतीने भरावे. निर्जंतुक केलेल्या बंदिस्त जागेत हे काम करावे. काड भरताना प्रथम 8-10 सें.मी. जाडीचा काडाचा थर द्यावा व त्यावर अळिंबीचे बियाणे (स्पॉन) पसरावे. स्पॉनचे प्रमाण ओल्या काडाच्या वजनाच्या 2 टक्के असावे. काड व स्पॉन याचे 4 ते 5 थर भरावेत. भरताना तळहाताने काड थोडेसे दाबावे. पिशवी भरल्यानंतर दोर्याने पिशवीचे तोंड घट्ट बांधावे. पिशवीच्या पृष्ठभागावर सुई किंवा टाचणीच्या सहाय्याने छिद्रे पाडावीत.
अळिंबी बुरशीच्या वाढीसाठी भरलेल्या पिशव्या निवार्याच्या जागेत मांडणीवर ठेवाव्यात. त्यासाठी 25-28 अंश सें. तापमान अनुकूल असते. बुरशीची पांढरट वाढ सर्व पृष्ठभागावर दिसून आल्यावर प्लॅस्टिकची पिशवी काढून टाकावी. बुरशीची वाढ होण्यास 15 ते 20 दिवस लागतात. बुरशीच्या धाग्यांनी काड घट्ट चिकटून त्यास ढेपेचा आकार प्राप्त होतो. यासच ‘बेड’ असे म्हणतात.
7. पीक निगा
धिंगरीचे प्लॅस्टिक पिशवी काढलेले बेड मांडणी किंवा शिंकाळ्यावर योग्य अंतरावर ठेवावे. बेडवर दिवसातून 2 ते 23 वेळा पाण्याची हलकी फवारणी करावी. खोलीमध्ये जमिनीवर, भिंतीवर पाणी फवारून 25 ते 30 सें. तापमान व हवेतील आर्द्रता 85 टक्के पेक्षा जास्त नियंत्रित करावी. तीन ते चार दिवसात बेडच्या सभोवताली अंकुर (पीनहेड) दिसू लागतात व पुढील 3 ते 4 दिवसात त्याची झपाट्याने वाढ होऊन फळे काढणीस तयार होतात.
बेड भरण्याची पद्धत बुरशीची पांढरट वाढ झालेला बेड अळिंबी लागवड खोली
8. काढणी
पहिली काढणी पिशवी भरल्यापासून 20 ते 25 दिवसात करावी. काढणीपूर्वी 1 दिवस अगोदर अळिंबीवर पाणी फवारू नये. यामुळे अळिंबी कोरडी व तजेलदार राहते. अळिंबीच्या कडा आत वळण्यापूर्वी काढणी करावी. लहानमोठी सर्व अळिंबी एकाच वेळी काढून घ्यावी. अळिंबीच्या देठाला धरून पिरंगळून काढणी करावी. दुसरे पीक घेण्यापूर्वी त्याच बेडवर हलका हात फिरवून कुजलेल्या व मोकळ्या झालेल्या काडाचा पातळसा थर अलगद काढावा. दिवसातून 2 ते 3 वेळा नियमितपणे पाणी फवारावे. त्यानंतर 8 ते 10 दिवसांनी दुसरे पीक तयार होते व पुढील 8 ते 10 दिवसांनी तिसरे पीक मिळते. साधारणपणे 3 किलो ओल्या काडाच्या (1 किलो वाळलेले काड) एका बेडपासून 50 ते 60 दिवसात 0.8 ते 0.9 किलो ताज्या अळिंबीचे उत्पादन मिळते.
11. प्रतवारी व पॅकिंग
अळिंबीची साठवणूक : ताजी अळिंबी पालेभाजीप्रमाणे अल्पकाळ टिकणारी व नाशवंत आहे. काढणीनंतर काडी कचरा बाजूला काढून स्वच्छ अळिंबी छिद्रे पाडलेल्या प्लॅस्टिक पिशव्यामध्ये दोन दिवस टिकू शकते. फ्रीजमध्ये 3 ते 4 दिवस टिकते. ताज्या अळिंबीस बाजारपेठ नसल्यास अळिंबी उन्हामध्ये वाळवावी. अळिंबी उन्हामध्ये दोन-तीन दिवसात पूर्णपणे वाळते. वाळलेली अळिंबी प्लॅस्टिक पिशवीत सील करून (हवाबंद) ठेवल्यास ती सहा महिन्यापेक्षा अधिक काळ चांगल्या स्थितीत राहते. वाळलेल्या अळिंबीचे वजन ओल्या अळिंबीच्या वजनाच्या 1/10 इतके कमी होते.
12. पिक संरक्षण :
अळिंबी हे अतिशय नाजूक, नाशवंत व अल्पमुदतीचे पीक आहे. उगवणीसाठी वापरणारे काड व इतर घटकांचे व्यवस्थित निर्जंतुकीकरण न झाल्यास तसेच खोलीमधील तापमान व आर्द्रता यामध्ये मोठा फरक झाल्यास तात्काळ रोग व किडीचा प्रादुर्भाव दिसून येतो. त्यामुळे पिकांचे नुकसान होते. धिंगरी अळिंबीवर प्रामुख्याने पुढीलप्रमाणे रोग दिसून येतात.
अळिंबीवरील रोग :
1) ग्रीन मोल्ड : हा रोग ट्रायकोडर्मा या बुरशीमुळे होतो. अळिंबीच्या बुरशीच्या वाढीच्या काळात प्लॅस्टिकच्या पिशवीत काडावर ट्रायकोडर्मा बुरशीची वाढ होऊन काडावर हिरवट काळे डाग पडून काड कुजते. या काडावर अळिंबीच्या बुरशीची वाढ होत नाही. फळे येण्याच्या काळात या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास फळावर काळे डाग पडून फळे कुजतात. काडांचे निर्जंतुकीकरण योग्यरित्या न झाल्यास या रोगाचा प्रादुर्भाव होतो व हवा, पाणी याद्वारे याचा प्रसार इतर अनेक पिशव्यांमध्ये होऊन नुकसान होते.
उपाय :
1) अळिंबी लागवडीसाठी वापरण्यात येणारे काड काळजीपूर्वक निर्जंतुक करावे.
2) हातांना निर्जंतुक औषध लावून पिशव्यांची हाताळणी करावी.
3) या रोगांचा प्रादुर्भाव दिसून येताच रोगग्रस्त पिशव्या तात्काळ वेगळ्या करून नष्ट कराव्यात.
4) बेडवर 2 टक्के तीव्रतेच्या फॉर्मेलीनची फवारणी करावी.
5) कार्बेडेझीम 0.1 टक्का द्रावणाची एका आठवड्याच्या अंतराने फवारणी करावी.
2) विषारी काळ्या छत्र्या : हा रोग कॉप्रिनस या बुरशीपासून होतो. प्लॅस्टिकच्या पिशवीत अळिंबीच्या बुरशीची वाढ होत असताना कॉप्रिनस बुरशीची वाढ होते. बेड सोडल्यानंतर अळिंबीच्या फळाऐवजी काळ्या रंगाच्या असंख्य छत्र्या काडावर वाढल्याचे दिसून येते.
उपाय :
1) काडाचे काळजीपूर्वक निर्जंतुकीकरण करावे.
2) बेडवर जास्त पाणी मारू नये.
3) बेडवर काळ्या छत्र्या दिसताच हाताने काढून नष्ट कराव्यात.
भारतातील मशरूम सल्लागार.
आपण बायोब्राइट कार्टमधून सर्व प्रकारचे मशरूम उत्पादने खरेदी करू शकता.
इष्टतम मशरूम कंपनी.
अधिक माहितीसाठी - https://biobritteagrosolutionspvtltd.in/shop.
फोनवर किंवा व्हॉट्सअॅपवर 9923806933 किंवा 7709709816 वर संपर्क साधा.
Tags - Mushroom farming, mushroom cultivation training, mushroom supplier, mushroom seeds, mushroom spawn company, Biobritte store, Biobritte cart, Biobritte fungi school, Mushroom training, Biobritte mushroom training online, mushroom franchise, mushroom contract farming, mushroom buyback, mushroom repurchase, mushroom spawn supply, mushroom cultivation, organic mushrooms, edible mushrooms, medicinal mushrooms,
Comments
Post a Comment