स्पॉन, अळिंबी उत्पादनाचा ‘कोल्हापूर मशरूम’ ब्रॅण्ड | Mushroom Marathi news

शिरटी (ता.शिरोळ,जि.कोल्हापूर) येथील उच्चशिक्षित परिमल रमेश उदगावे या युवकाने बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन अळिंबी (मशरूम) स्पॉन निर्मिती, करार शेती त्याचबरोबरीने स्वतः अळिंबी उत्पादन, विक्रीतून व्यवसायाला नवी दिशा दिली.


शिरटी (ता.शिरोळ,जि.कोल्हापूर) येथील उच्चशिक्षित परिमल रमेश उदगावे  या युवकाने बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन अळिंबी (मशरूम) स्पॉन निर्मिती, करार शेती त्याचबरोबरीने स्वतः अळिंबी उत्पादन, विक्रीतून व्यवसायाला नवी दिशा दिली. डिजिटल मार्केटिंगच्या माध्यमातून शेतकरी आणि ग्राहकांशी संपर्क साधत नवी बाजारपेठ विकसित केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरटी हे शिरोळ तालुक्यात ऊस उत्पादनासाठी प्रसिद्ध गाव. या गावातील युवा शेतकरी परिमल रमेश उदगावे यांनी ऊस शेतीच्या बरोबरीने २०१८ पासून अळिंबी उत्पादन व्यवसाय सुरु केला. इंग्लंडमध्ये एमएससी बायोटेक्नॉलॉजी झाल्यानंतर काही काळ दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात त्यांनी नोकरी केली. त्यानंतर परदेशातील प्रयोगशाळेत एक वर्ष नोकरी केली. या अनुभवानंतर गावी परत येत त्यांनी २०१८ मध्ये बाजारपेठेचा अभ्यास करून अळिंबी उत्पादनाचा निर्णय घेतला. 



स्पॉन निर्मिती, अळिंबी उत्पादन आणि विक्रीतून त्यांनी व्यवसायाला नवी दिशा दिली. सध्या जयसिंगपूर येथे स्पॉन निर्मितीची प्रयोगशाळा आणि  शिरोळ येथे अळिंबी उत्पादन घेतले जाते.  व्यवसायाची सुरवात   परिमल उदगावे यांनी पहिल्यांदा अळिंबी उत्पादन, बाजारपेठेचा अभ्यास केला. विविध शहरातील बाजारपेठांमध्ये चौकशी केली. मागणीचा अंदाज घेतला.  अजूनही अळिंबी उत्पादनात व्यावसायिक स्पर्धा कमी असल्याने त्यांनी हा पूरक व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. उत्पादनासाठी लागणारा भुसा आणि अन्य कच्चा माल स्वस्त मिळत असल्याने अळिंबी उत्पादन आणि विक्रीला सुरवात केली. ग्राहकांच्याकडून चांगला प्रतिसाद मिळाल्याने त्यांनी स्पॉन निर्मिती प्रयोगशाळा आणि  अन्य साहित्यासाठी सुमारे तीस लाखांपर्यंत भांडवली गुंतवणूक केली. अळिंबी उत्पादनाच्या तिन्ही पातळीवर काम करून विविध मार्गाने नफा मिळविण्यात त्यांना यश मिळाले आहे.